मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

चारोळी संग्रह

तुझं पुनरुत्थान निश्चित असलं

तरी तुझं मरण आमच्याने टळत नाही
कारण आम्ही काय करतो ते
आज ही आम्हास कळत नाही
जगा जन्म देणारा उदर तू
तरी हा नर ना दाखवी दया…
कुणाची राखी, कुणाचा पदर तू
तरी होतेस तू निर्भया …

कधी धुव्वाधार अंगणी बरसतो
तू कधी डोळयांतून वाहतो
तू कधी वेदना ओली
कधी जीव मम तुझ्यासवे मोदे नाहतो

बालपणी माझी ढाल हाेतास तू
जीवास जीव देणारा माझा सखा होतास तू
वैद्याच्या हलगऱ्जीने अकाली निघुन गेलास तू
पण माझ्या भावा कायमचा माझ्या मनांत राहिलास तू

वेळ तुला मिळत नाही
माझा, सरता सरत नाही
तुझ्याकडे तू तरी आहेस
माझ्याकडे मीही नाही !

हाकोट पासून कागात घेऑन
लिवीते खोडते, लिवीते खोडते
तु पोरे टाकॉन बोठी कवियत्री जाल्या
मॅ आपलॉ सुलिवर आंदान ठोविते.

तू तुझं मी माझं
जगण्याचं आज गणित झालंय
तुझ्यातला मी माझ्यातली तू
शोधणं म्हणूनच आज कठीण झालंय

रिकामी खुर्ची तुझी
थरथरते कोपऱ्यात
घेऊन जाते मला
आठवणींच्या राज्यात

प्राजक्तानं भरलेली ओंजळ
भोवती सवंगड्यांचा वेढा….
हरवलेत आता हे क्षण सुगंधाचे…
उरलाय फक्त आठवणींचा सडा…

ओंजळभरच मागणे माझे
तो छप्पर फाडून देतो
मग छप्पर डोक्यावर पडले म्हणून
मी कुरकूरत बसतो

तुझ्या आठवणींचे प्रेमचित्रे
माझ्या नसानसात साठवले,
पण भावनांचे ऋणानुबंध
आता ओंजळीतून निसटले

दिलं तिने भरभरून
ओंजळ तिची सदा भरलेली
राहिली चालत स्वर्गाच्या वाटेवर
परतीची वाटच नाही उरलेली

माझ्या ह्रदयातील प्रेम
तुला कसे कळवू
ओंजळीतून निसटलेले क्षण
पुन्हा कसे मिळवू .

अळवावरचे मोती
ओंजळीत वेचू
ओंजळ झाली रिती
तरी हर्षाने नाचू.

देणाऱ्या हातांना
जगही किती छोटंय
घेणाऱ्या हातांना
ओंजळही खूप मोठीय

रिती आठवणीची ओंजळ
रिते उसवलेल्या नात्यांचे धागे
अबोल पापणी ही एकाकी
न उरलीं आसवें डोळ्यात मागे

ओंजळ भरून देणारं कुणी असेल
तर मागण्यात अर्थ आहे
मुठी बंद करुन आवळून येणार असतील
तर पसायदानही व्यर्थ आहे

माझी रिती ओंजळ
तुझ्या ओंजळीत सामावली
सुख-दु:खाच्या आपल्या संसारात
ती दुथडी भरून वाहताना पाहिली

किती पिरगाळली मुंडकी
स्वप्नं जितीच राहिली
हात झाले ओले केवळ
ओंजळ रितीच राहिली

मी ओंजळीतून अगणित  फुले,
तुझ्या चरणी अखंड वाहिली.
माझ्या प्राक्तनातली ओंजळ मात्र
सदा रिकामीच राहिली

रंग नव्हे मोगऱ्याचा..
पण मोगऱ्याला वास तुझा..
मोगऱ्याच्या वासामधे..
भर दुपारी भास् तुझा…

हुंदका मूक-वेदनेचा
हवेत विरून गेला
एक मोगरा, काल माझं
काळीज चिरून गेला

मोगरॉ लावीलॅ शंभर केळीला
शार पुड्यो नाय निघात एका खुड्याला
ऑखांद, मजुरीत कय नाय वरॅ
शेतकऱ्या पेक्षा पासवलॅ बरॅ .

अाज बर्याच वर्षांनंतर पाहिला मी,
दारातला ताे माेगरा तुझ्या केसात खुललेला,
तु माहेरपणाला आलेली,
अन् माझा जीव भुतकाळात रमलेला.

मोगऱ्याला गजऱ्यात बांधणं
खरंतर मला पटत नाही,
पण तुझ्या केसात माळायाचं म्हटलं की
मोगऱ्याला ते बंधन वाटत नाही.

तिच्या अंगणी मोगरा
त्याच्या परसात जाई फुललेली….
कातरवेळचा नेत्रपल्लव
आणि जन्मांतरीची साथ गुंफलेली ….

मन माझे मोगरा बनूनी,
तव सुगंधाचे लेणे लेई.
प्रणयाचे गाणे हर श्वासात,
अवघे अंग शहारून जाई.

सुकलेला तो मोगऱ्याचा गजरा
अजुनही जपुन ठेवलाय मी
त्या गजऱ्याला गंध आहे तुझा
म्हणूनच ताे लपवुन ठेवलाय मी.

नको देऊस चंद्र नभीचा,
नको आणूस मजला  तारे.
सच्च्या प्रेमाची साक्ष देण्या,
मोगरा मज केसात माळरे.

दमछाक होतेय माझी
फाटक्या काळजाला ठिगळं लावताना,
जीव सुकत चाललाय
आठवणींचं मढं सोबत वाहताना…

दिवसभर टपकतोय पाऊस
मी शोधतोय तुझी चाहूल
वाट अजून पाहतोय तुझी
एकटेपणाला सोबत घेऊन.

पुरलेल्याला जळवायची
तुला भारीच वाटते गम्मत
आलीहेस माझ्या खाचेवर
बॉयफ्रेंडला घेऊन सोबत

वाटलीच भिती क्रुसाची
तर खिळे सोबतीला घे…
क्रुसच असेल नशिबी
तर क्रुसाला खिळून घे…

संसाराचा सारीपाट खेळते मी तुझ्यासवे
सोबतप्रिया,तुझी मज गमते रे
जिंकावे मी म्हणोनि तू हरावे
रित तुझी ही न्यारी उमगते रे।

मी तुझ्यात
आणि तू माझ्यात असताना
आणखी कुठली सोबत
हवीय जगताना

जीवन हे कसं क्षणभंगुर असतं
बोलावणं आलं की निघायचं असतं
आठवणींच्या कप्प्यात दु:ख लपलेलं असतं
वास्तवाची सोबत घेत सुन्न मन जगत असतं…

साेबत तू असताना,
अंधारही हिम्मत देतो,
सोबत तुझ्या नसण्याने,
प्रकाशही पांगळा होतो.

आभाळात माझ्या आज
लुकलुकते ही चांदणी नवी
चांदव्यासम सोबत तुझी
अखेरच्या श्वासापर्यंत हवी

तू विसरलीयेस मला पुरती
हा दावाच आहे लबाड
अासवांनी भिजलेल्या उशीखाली
का दडवलंय चिठ्ठ्यांचं घबाड ?

माला भॉट॒टयाआ मेरॅ ,तुला लान्याआ घारा
केली वाटणी आपली,आयुष्या हान्शापरा
स मयन्यात तुऑ, बोल नाय आयकिलॉ
मा कुडीतसॉ जीव,जॅत॒तॅ जीवॅ कडॉन नीलॉ.

निरव रात्री एकाकी शय्येवर
कुठलासा काटा टोचत राहतो,
थरथरत्या उशीवर चिंब डोळ्यांतून
तुझ्या विरहाचा झरा वाहतो…

स्तनावरील पान्हाळलेले दुधाचे थेंब
आज आटले…
कुस्करलेल्या बालिकेच्या विरहात
मातृह्र्दय फाटले….

विरहाच्या खोल सागरात
भरकटतेय माझी नाव,
आस लावूनी बसलीये ती
एक दिवस मिळेल तुझं गाव…

पावसातील तुझा विरह
यावेळी खूपच लांबलाय
वाट बघून पाऊस सुद् धा
डोळयांत येऊन थांबलाय

आजकालचं प्रेम अगदी
अळवावरचं झालंय पाणी,
हृदयीच्या गाभ्यात पोहचण्याआधी
देते विरहाच्या आठवणी.

तुझ्या जन्मतारखेचा सीरियल नंबर असलेली नोट,
दहा वर्ष जपून आज तुलाच आहेर म्हणून देतोय…
भरल्या डोळ्यांनी लग्नाच्या मंडपातून तुझ्या,
माझ्यासाठी मी कायमचा विरह नेतोय…

नेसत नाही ती लाल साडी
माळत नाही ती अबोली गजरा
झुरत झुरत  जाते मनात
जेव्हा कोकिळ गातो रानात

केव्हातरी आपण, ढगांवर आरुढुन वेचललं चांदणं;
इंद्रधनुला कवेत घेऊन उधळलेले शतरंग:
अन् आज, एका मोहरल्या स्पर्शासाठी कातरलेलं मन्;
धुकंभरली पहाट नि आतुरलेलं तन्…..

धाव तुझी अखेरची
डोळ्यांत सलत आहे
थडग्यावरील मेनवात
अजूनी काळजात जळत आहे
आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल ! 


प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं 



माझ्या मनात काय आहे,
ते तु अचुक ओळखतेस ..
ओळखूनी मग असे
तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस ! 


तुझ्या डोळ्यात पाहता
मीच मला दिसते
तुझ्यात असलेली मी पाहुन
गालातल्या गालात हसते



कधी कधी अनोळखीच
जास्त जवळचे वाटतात
थोड्यासाठी असतो एकत्र
नंतर.. अनेक वाटा फुटतात



तो चंद्र आणि मी
आठवतं प्रिये तुला
दोघेपण कसे गोड हसतो
हे सांगत होतीस मला


तु समोर असल्यावर
आसपास कुणी नसाव
एकसारख तासन्तास
वाटतं पहात बसाव


त्या दिवशी निरोप घेताना
माझ्याकडे बघुन गालात हसलीस
पहिल्यांदाच काळजात धक होऊन
मनात माझ्या रुतुन बसलीस


मला कळतय ग तुझं
उदास आणि बैचेन मन
मी पण तुझ्याच आठवणीत
हरवुन जातो प्रत्येक क्षण


तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मनात आठवत राहिल
दिलासा देणारं तुझं बोलण
मनाला नेहमीच हसवत राहिल


तुझ्या मिठीतील गोडवा
नेहमीच मला भावतो
जसा थंडीच्या दिवसातील गारठा
क्षणार्धात निघुन जातो


सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले


माझ्यासमवेत जगताना
तू किती भावुक होतोस
सर्व काही मलाच देऊन
तू रिकामा कसा राहतोस


तुझ ते झुरने मला
त्यावेळेसच जाणवले होते
जेव्हा त्या शांत कातरवेळी
तुझे डोळे पानावले होते


माझ्या हसण्याला तू पण
खळखळुन दिलीस दाद
त्या शीतल चंद्राच्या छायेत पण
मज वाटली घालावी तुला साद


हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले



तुझा तो पहिला स्पर्श
आजही मला आठवितो
ते दुर्मिळ रोमांचीत क्षण
आजही मनात साठवितो


तू अशी लाजलिस की
मलाही काही सूचत नाही
तुज़े मुरकने पहिल्याशिवाय
मला चैन पडत नाही

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा