अटल बोगदा : सर्वात उंच व लांब बोगदा.
अटल बोगदा......
----------@@@--------------
प्रसिद्ध अश्या रोहतांग पास च्या खालून जाणारा रोहतांग बोगदा ज्याचं नामकरण ' अटल बोगदा ' असं केलं गेलं जो आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते लोकार्पण झाले. देशातील सर्वात मोठा हा बोगदा सामान्य नागरिकांसाठी आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या क्षणी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. भारताला लेह-लडाखशी जोडणारा मनाली- लेह महामार्ग जवळपास ८ महिने अति- बर्फ़वृष्टीमुळे बंद असतो. त्यामुळे ह्या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटून जातो. संपुर्ण वर्षभर लेह- लडाखशी संपर्कात राहण्यासाठी ह्या महामार्गावर सगळ्या काळात वाहतूक करण्यास सक्षम असेल असा बोगदा असावा असा क्रांतिकारी विचार १८६० मध्ये मांडला गेला होता. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही ह्याकडे कोणत्याच राजकारण्याने लक्ष दिलं नाही. तब्बल १४० वर्षांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी ३ जून २००० रोजी ह्या बोगद्याची घोषणा केली. पण राजकीय नेतृत्व बदलल्यामुळे हवी तशी गती ह्या कामाला आली नाही. ह्या शिवाय अनेक तांत्रिक अडचणी ह्या कामात समोर उभ्या राहिल्या पण मात करत आज हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होतो आहे.
समुद्र सपाटीपासून जवळपास ३१०० मीटर (१०,१७० फूट) उंचीवर असणारा आणि तब्बल ८.८ किलोमीटर लांबीचा आहे. जगातील १०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर इतका लांब असणारा हा एकमेव बोगदा आहे. पीर- पांजाल च्या पर्वत रांगानखालून जाणारा हा बोगदा मनाली बाजूने धुंडी गावापासून सुरु होऊन पलीकडच्या बाजूला जुन्या लेह- मनाली रस्त्याला तेलींग इकडे जोडतो. ह्या बोगद्यामुळे मनाली ते केलोंग ह्या मधील अंतर जवळपास ४६ किलोमीटर ने कमी झालं आहे. हे अंतर वाचल्यामुळे मनाली ते लेह- लडाख हा प्रवास वर्षातील जवळपास सगळ्या महिन्यात शक्य होणार आहे. रोहतांग पास ओलांडण्यासाठी होणाऱ्या अडथळ्यातून सुटका होणार आहे. वेळ बचतीमुळे इंधन वाचणार आहे. ह्याशिवाय प्रदूषण कमी होणार आहे. ह्या सर्वाचा फायदा पर्यायाने सगळ्यात जास्ती भारताच्या सैन्याला होणार आहे. वर्षभर सैन्याची वाहने रसद, दारुगोळा लेह- लडाख मध्ये नेऊ शकणार आहेत. ह्याशिवाय रोहतांग ला भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे होणाऱ्या ट्राफिकला बाजूला सारून सैन्याला वाहतूक करता येणार आहे.
हा बोगदा बांधायला ३८०० कोटी रुपये खर्च आला आहे. जवळपास ३००० कंत्राटी कामगार आणि ६५० बी.आर.ओ. चे कर्मचारी २४ X ७ ह्या रस्त्याचं बांधकाम करत होते. ह्या बोगद्याच्या निर्मितीत अनेक अडचणी अभियांत्रिकीच्या दृष्टीने समोर आल्या. एकतर इतक्या उंचीवर हिमालयाच्या पर्वतरांगांना पोखरून बोगदा बांधणं खूप जोखमीचं होतं त्यात ह्या बोगद्याच्या मार्गात असलेल्या पाण्याच्या वाहिनीमुळे खूप मोठा धोका समोर उभा राहिला होता. पोखरून काढलेली ८००,००० घन मीटर दगड माती कुठे टाकायची हा प्रश्न ही मोठा होता. ह्याशिवाय रोज जवळपास ३ मिलियन लिटर प्रति दिवस निघणार पाणी नियंत्रित करणं खूप मोठी अडचण ह्या बोगद्याच्या निर्मितीत होती. पण ह्या सगळ्यावर मात करत ह्या बोगद्याचे अशक्य वाटणारे काम भारतीय अभियंतांनी पूर्ण तर केलं पण हा बोगदा अतिशय नाविन्यपूर्ण सुरक्षतेतीच्या क्षमतेने निर्माण केला गेला आहे.
ह्या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर वर टेलीफोन ची सोय आहे. प्रत्येक ६० मीटर वर आग विझवण्यासाठी नळ बसवलेला आहे. प्रत्येक ५०० मीटर वर आपात कालीन निकास आहे. प्रत्येक किलोमीटरवर हवेच प्रदूषण मोजण्याची आणि नियंत्रण करण्याची सोय आहे. प्रत्येक २५० मीटरवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवलेले आहेत. ज्यामुळे वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे. ह्या बोगद्यातून वाहनांचा वेग ८० किलोमीटर/ तास इतका नियंत्रित करण्यात आला आहे. दररोज जवळपास ३००० कार आणि १५०० ट्रक ह्यांची वाहतूक होणार आहे. जवळपास वर्षभर हा बोगदा बर्फाने झाकलेला असणार आहे. हिमस्खलन अथवा दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून ह्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेन्सर बसवण्यात आले आहेत ज्याची यंत्रणा डी.आर.डी.ओ. ने विकसित केली आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे अटल बोगदा देशातील अभियांत्रिकीचा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ह्याच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वच अभियंते, कामगार, आणि ह्याचे स्वप्न बघून ते प्रत्यक्षात तयार करणाऱ्या सर्व यंत्रणा ह्यांना माझा सलाम. 'अटल बोगदा' देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी वरदान ठरणार आहे.
टिप्पण्या